Headlines

हॉटेल, स्वीट मार्ट व किरकोळ विक्रेत्यांच्या नमुन्यांची तपासणी करून दोषींवर कारवाई करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता • 15 ऑगस्टपर्यंत अन्न आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवा

हिंगोली दि. 17 : जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने दि. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवून प्रमुख हॉटेल, स्वीट मार्ट व किरकोळ विक्रेत्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकाव्यात तसेच अन्नपदार्थांचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी प्रसाद हजारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पवनकुमार खताळ, अन्न सुरक्षा अधिकारी राजर्षी सावंत तसेच शिक्षण व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी अन्न व्यवसायिकांच्या आस्थापनांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देताना प्रमुख हॉटेल व स्वीट मार्टच्या स्वयंपाकगृहांची, साठवण व्यवस्थेची, स्वच्छतेची आणि कचरा व्यवस्थापनाची सखोल पाहणी करण्यावर भर दिला. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच तपासणी व धाडींच्या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी जास्तीत जास्त धाडी व तपासणी मोहीमा राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
*******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *