**सहारा न्यूज प्रतिनिधी : अकोला**
अकोला रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या आणि बोलता व ऐकता न येणाऱ्या (मूकबधिर) एका बालकाला त्याच्या कुटुंबाशी मिळवून देण्याची किमया ‘आधार’ कार्ड प्रणालीमुळे शक्य झाली आहे. तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आज (१ जून) अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत या बालकाला त्याच्या कुटुंबाच्या सुपूर्द करण्यात आले. मुलाला पाहताच कुटुंबीयांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
**नेमके काय घडले?**
गेल्या ८ एप्रिल रोजी लोहमार्ग चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांना अकोला रेल्वेस्थानकावर एक बालक एकटेच भटकत असताना आढळले. कर्मचाऱ्यांनी त्याची विचारपूस केली, मात्र बालक मूकबधिर असल्याने कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्याला शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले.
**पत्ता शोधण्याचे मोठे आव्हान**
मुलाचा पत्ता शोधण्यासाठी बालकल्याण समितीचे सुनील लाडुलकर यांनी शासकीय मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पाचारण केले. मात्र, तरीही बालकाचा पत्ता आणि नाव समजू शकले नाही.
**असा लागला आधार कार्डवरून शोध!**
श्री. लाडुलकर यांनी त्या बालकाची नवीन आधार नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २० दिवसांनंतर १९४७ या आधार टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, या बालकाची आधीच आधार नोंदणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जुना आधार क्रमांक मिळवण्यासाठी तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात झाली. महाआयटीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांनी तांत्रिक सहकार्य केले आणि मुंबईच्या आधार कार्यालयाशी संपर्क साधून जुना आधार क्रमांक मिळवण्यात आला.
त्यानंतर अकोला तहसील कार्यालयात ऑपरेटर सतीश पडगण यांच्या सहकार्याने बालकाच्या डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार प्रणालीवरून पूर्ण माहिती मिळवण्यात आली. यात बालकाच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक सापडला.
**व्हिडिओ कॉलवर पाहताच अश्रूंचा बांध फुटला**
मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून वडिलांना मुलगा सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. व्हिडिओ कॉलद्वारे मुलाला पाहताच संपूर्ण कुटुंबाला मोठा आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १ जून रोजी बालकाचे आई-वडील आणि काका अकोल्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते या बालकाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.
या भावूक प्रसंगी बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, डॉ. विनय दांदळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, बालगृहाच्या अधीक्षक जयश्री हिवराळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
**ताज्या आणि सविस्तर घडामोडींसाठी SaharaNews.in ला भेट द्या आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा!**