सहारा न्यूज प्रतिनिधी :
हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी मोहिमांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, दुधासह विविध खाण्यायोग्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात दूध, मावा, तूप, खाद्यतेल, मसाले, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळविरोधी कारवाया वाढवल्या असून दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ ही गंभीर समस्या असल्याचे विविध अहवालांतून समोर आले आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भेसळयुक्त दूध, खाद्यतेल आणि अन्य पदार्थांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला आहे.
मात्र, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी आणि औंढा या तालुक्यांमध्ये अशा कारवायांचे प्रमाण अत्यल्प असल्याने भेसळखोरांवर प्रशासनाचे नियंत्रण उरले आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नियमित नमुना तपासणी, अचानक धाडी आणि प्रयोगशाळा चाचण्यांची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे.
तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. राज्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासनाने भेसळविरोधी कारवाया तीव्र केल्या असताना, हिंगोली जिल्हा कारवाई करण्यामध्ये मागे का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
अशा प्रकारच्या विविध आणि ताज्या बातम्या वाचण्यासाठी SaharaNews.in या वेबसाईटला भेट द्या व आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.