- अकोला, दि. २७ : शहरात अपघात टाळण्यासाठी महत्वाच्या अपघात प्रवणस्थळी ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) बसविण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, निमंत्रित सदस्य प्रदीप गुरूखुद्दे, मनपा उपायुक्त गीता वंजारी, मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके आदी उपस्थित होते.
‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’मध्ये ॲटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन, ट्रॅफिक व्हायोलेशन डिटेक्शन, सीसीटीव्ही ॲनालिटिक्स, व्हेईकल ट्रॅकिंग आदी सुविधांचा समावेश आहे. ही प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी जलद कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.
मस्तान चौक ते भोला चौक (अकोटपेठ पुलापर्यंत) दरम्यानची वाहतूक एकेरी करण्याबाबत, तसेच शहरातील काही भागांत जड वाहनांची वाहतूक प्रतिबंधित करण्याबाबत अधिसूचना काढण्यासंदर्भातही यावेळी आदेश देण्यात आले. अकोट पेठ रेल्वे उड्डाण पूल प्रस्ताव, कॅनल रोडला रेल्वे अंडरपास आदी विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. रस्ते अपघात प्रणालीवरील प्रलंबित प्रकरणांचा संबंधित विभागांनी निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
०००