**सहारा न्यूज विशेष वृत्त** # **तुकाराम मुंढेंचा दणका! हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती केल्यास थेट कारवाई; रुग्णांना मोठा दिलासा**

**हिंगोली:**
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हॉस्पिटल्स आणि त्यांना जोडलेल्या मेडिकल स्टोअर्सच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ‘हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करा’, अशी सक्ती आता रुग्णांवर करता येणार नाही. असा कडक आदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त **तुकाराम मुंढे** यांच्या मार्गदर्शनाखाली जारी करण्यात आला आहे.
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटल आणि मेडिकल चालकांवर आता थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
### **नेमकं प्रकरण काय?**
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक खाजगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्याच हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात होती. बाहेर औषधे स्वस्त मिळत असतानाही, नातेवाईकांना महागडी औषधे हॉस्पिटलमधूनच घेण्यास भाग पाडले जात होते. यामुळे रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.
सामाजिक कार्यकर्ते **नितीन भुतारे** यांनी या गंभीर प्रकाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला.
### **प्रशासनाचे नवे आदेश आणि नियम:**
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त **जा. ह. शेख** यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्स आणि मेडिकल धारकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे:
* **रुग्णांचा अधिकार सर्वोच्च:** रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही दुकानातून (बाहेरून) औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असेल.
* **माहिती फलक लावणे बंधनकारक:** प्रत्येक हॉस्पिटल आणि मेडिकलच्या दर्शनी भागात *”रुग्णांना आमच्याच मेडिकलमधून औषधे घेण्याची कोणतीही सक्ती नाही, ते बाहेरून औषधे आणू शकतात”* असा स्पष्ट फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
* **थेट परवाना रद्दची कारवाई:** रुग्णांवर सक्ती केल्याचे किंवा बाहेरून औषधे आणल्यास उपचार नाकारल्याचे समोर आल्यास संबंधित हॉस्पिटल आणि मेडिकलवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
> **”रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक सहन केली जाणार नाही. प्रत्येकाला आपल्याला हव्या त्या अधिकृत मेडिकलमधून औषध घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जर कुठल्याही हॉस्पिटलने सक्ती केली, तर नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी; संबंधित हॉस्पिटलवर कडक कारवाई केली जाईल.”**
> — *अन्न व औषध प्रशासन विभाग*
>
### **रुग्णांची आर्थिक लूट थांबणार!**
अनेकदा खाजगी हॉस्पिटल्समध्ये औषधांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले आकारली जातात. तुकाराम मुंढे यांच्या या नव्या मोहिमेमुळे आता डॉक्टरांच्या आणि मेडिकल चालकांच्या अभद्र युतीला लगाम बसणार आहे. प्रशासनाच्या या धडक निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सामान्य रुग्णांना आणि त्यांच्या हवालदिल नातेवाईकांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
**- ब्युरो रिपोर्ट, सहारा न्यूज.**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *