विशेष बातमी | सहारा न्यूज (कलमनुरी)
हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी शहर व परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेल्या ओढीमुळे शेतकरी आणि नागरिक तीव्र चिंतेत सापडले आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके सुकू लागली असून जनावरांच्या चारा व पाण्याच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि चांगल्या पावसासाठी ११ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह मैदानावर विशेष नमाज (नमाझे इस्तिस्का) पठण करून सामूहिक दुवा मागण्यात आली.
पिकांवर संकट, पाणीटंचाईची सावली
शुरुवातीच्या पावसानंतर बहरलेली खरीपाची पिके पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा राहण्याची शक्यता आहे. पिकांना पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने मुसळधार पावसाची गरज असल्याने सर्वच स्तरातून चिंतेचे वातावरण आहे.
शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना
ईदगाह मैदानावर आयोजित या विशेष प्रार्थनेत बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते. पावसासोबतच देशात व जगात अमन-शांतता, मानवाचे कल्याण, एकता आणि प्राणिमात्रांचे रक्षण व्हावे यासाठीही प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शहर काझी मुफ्ती शुजाअत फारूखी, मौलाना शफीक रझा, मौलाना यासीन रझा, हाफीज राशीद अशरफी यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक व ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.