Headlines

आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात शिक्षकांचा एल्गार; ‘आधी निवास, मग मुख्यालयाची सक्ती’चा निर्धार

(विशेष प्रतिनिधी, Saharanews.in):
ग्रामीण भागातील शिक्षकांना मूलभूत निवासाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून न देता, केवळ मुख्यालयी राहण्याची सक्ती करणाऱ्या प्रशासकीय भूमिकेविरोधात गंगापूर तालुक्यातील शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात मुख्यालयाच्या प्रश्नावरून शिक्षक संघटनांमध्ये अभूतपूर्व एकजूट झाली असून, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व शिक्षक सामूहिक रजा काढून भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करणार आहेत.
निवासाचा प्रश्न ऐरणीवर
तालुक्यातील अनेक शाळांच्या ठिकाणी शिक्षकांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था नाही. घरे किंवा खोल्या भाड्याने मिळणे कठीण असून, कुटुंब एकत्र राहण्यासाठी आवश्यक सुविधांचा मोठा अभाव आहे. त्यातच पती-पत्नी दोघेही शिक्षक असल्यास वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती, मुलांचे शिक्षण आणि सुरक्षा या सर्व बाबींचा विचार न करता प्रशासनाकडून सक्ती केली जात असल्याचा आरोप ‘शिक्षक समन्वय समिती’ने केला आहे. “आधी सुरक्षित निवासव्यवस्था द्या आणि त्यानंतरच मुख्यालयाची सक्ती करा,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.
वडाच्या झाडापासून मोर्चाला सुरुवात
१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लासूर नाक्याजवळील सार्वजनिक विश्रामगृहासमोरील वडाच्या झाडाजवळील मैदानातून मोर्चाला सुरुवात होईल. तिथून महाराणा प्रताप चौक, लासूर नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा पंचायत समिती परिसरातील गटविकास अधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. आंदोलनस्थळी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन धरून मागणीचे निवेदन सादर केले जाणार आहे.
मुख्य मागण्या व वैशिष्ट्ये:
* सामूहिक रजा: तालुक्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येत १५ सप्टेंबर रोजी सर्वांनी सामूहिक रजेवर जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
* तहसीलदारांना निवेदन: यापूर्वी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत.
* प्रशासकीय त्रासाला विरोध: मुख्यालयाच्या नावाखाली शिक्षकांना होणारा त्रास थांबवून प्रशासनाने वास्तववादी व सामाजिक दृष्टिकोन ठेवावा, अशी मागणी होत आहे.
‘आधी निवास द्या, मगच मुख्यालयाची सक्ती करा’ या मागणीवर शिक्षक ठाम असून, आता प्रशासन या आंदोलनाला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण गंगापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *