हिंगोलीत लाचखोर तलाठ्याला रंगेहात अटक; जमिनीच्या फेरफारसाठी मागीतली होती लाच

**हिंगोली:**
जमिनीच्या फेरफारची नोंद ७/१२ वर लावण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच घेताना खिल्लार (ता. सेनगाव) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. रामेश्वर अर्जुन रोडगे (वय ४३) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
### काय आहे प्रकरण?
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर हक्कसोड वाटणीतून आलेली ५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीचा फेरफार करून ७/१२ वर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात धाव घेतली होती. मात्र, तलाठी रामेश्वर रोडगे याने हे काम करून देण्यासाठी २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी ८ हजार रुपये तक्रारदाराने २ जून रोजी त्याला दिले होते. उर्वरित १४ हजार रुपये दिल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही, असा तगादा तलाठ्याने लावला होता.
### सापळा आणि कारवाई
पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आज (५ जून) पडताळणी करण्यात आली. यात आरोपी तलाठ्याने लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात सापळा रचला. पंचांसमक्ष १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रोडगे याला रंगेहात पकडले.
### आरोपीकडून जप्ती
आरोपीच्या अंगझडतीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, दोन बँकेचे एटीएम कार्ड आणि ६,७५० रुपयांची रोख रक्कम सापडली. याव्यतिरिक्त, पोलीस आता त्याच्या घराचीही झडती घेत आहेत.
याप्रकरणी पोलीस स्टेशन नर्सी नामदेव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलीस उप अधीक्षक विकास घनवट आणि पोलीस निरीक्षक सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
**अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी ‘सहारा न्यूज’ (saharanews.in) ला भेट देत राहा.**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *