हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर भीषण अपघात: पिकअप आणि बुलेटच्या धडकेत दोन जि.प. शिक्षकांचा जागीच मृत्यू

हिंगोली: हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर सेनगाव शहराजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव पिकअप आणि बुलेट यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी या मृत शिक्षकांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत आणि त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.
​प्राप्त माहितीनुसार, मृत्यू झालेले गजानन पत्की आणि संतोष देसाई हे दोघेही हिंगोली जिल्ह्यातील वरुड चक्रपान या गावचे रहिवासी होते.
​सेनगाव शहराजवळ येत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की धडक बसताच बुलेटचा आणि दोन्ही शिक्षकांच्या शरीराचा अक्षरशः चक्काचूर झाला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मानवतेला काळिमा फासत, पिकअप चालकाने जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला.
​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या फरार चालकाचा शोध घेत आहेत. हे दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असल्याने परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जनगणनेचे काम करून ते सुखरूप परत येतील अशी आशा कुटुंबीयांना असतानाच, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने वरुड चक्रपान गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन हसत्या-खेळत्या शिक्षकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिक नागरिक आणि शिक्षण वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
​अशा प्रकारच्या विविध बातम्या, घडामोडी आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या SaharaNews.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्याचप्रमाणे आमचे फेसबुक पेज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *