बालविवाह प्रतिबंधासाठी समन्वय व सजगतेवर भर * जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उजळणी प्रशिक्षण संपन्न

हिंगोली दि. 27 : बालविवाह निर्मूलन विषयावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मधील विविध कलमे, बालविवाहाची कारणे, त्याचे दुष्परिणाम तसेच बालविवाह रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी माहिती दिली. यावेळी बालविवाहास प्रतिबंध, शिक्षेच्या तरतुदी, बालकांचे संरक्षण, न्यायालयीन अधिकार तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यातील सध्यस्थितीतील बालविवाह परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयातून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालविवाह निर्मूलन मोहिमेमध्ये विविध विभागांची भूमिका व जबाबदारी, जनजागृतीचे महत्त्व तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व मदतीविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमास अंकुर पाटोडे, समुपदेशक, चाईल्ड हेल्पलाईन 1098 तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी समन्वय, सजगता व कायदेशीर कार्यवाही यावर विशेष भर देण्यात आला.
*******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *