Headlines

​भीमाशंकरच्या संवेदनशील पर्वत रांगेतील ‘टोरोंट पॉवर’ प्रकल्पाविरोधात तीव्र संताप; प्रकल्प तात्काळ स्थलांतरित करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी

​कळमनुरी/हिंगोली:
कर्जत (जिल्हा रायगड) येथील अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्री भीमाशंकर पर्वत रांगेमध्ये ‘टोरोंट पॉवर’ कंपनीच्या वतीने ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली परिसरातील हजारो दुर्मिळ वृक्ष आणि झाडांची बेसुमार कत्तल केली जात असून, या निसर्गाच्या संहारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. हा प्रकार पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असून, हा प्रकल्प या संवेदनशील क्षेत्रातून अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी आक्रमक भूमिका ‘माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ), महाराष्ट्र’ शाखा कळमनुरी या संघटनेने घेतली आहे.
​सदर निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उद्देशून असून, ते कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भूते यांच्या मार्फत सादर करण्यात आले. यावेळी कळमनुरीचे तहसीलदार जीवक कांबळे यांचीही विशेष उपस्थिती होती.
​भीमाशंकरचा हा परिसर महाराष्ट्राचे नैसर्गिक वैभव असून अनेक वन्यजीव व दुर्मिळ वनस्पतींचे आश्रयस्थान आहे. अशा पवित्र आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात हा विनाशकारी प्रकल्प राबवणे अत्यंत चुकीचे असल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे.
​माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या प्रमुख मागण्या:
​ भीमाशंकर पर्वत रांगेत टोरोंट पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने आणि कायमस्वरूपी थांबवण्यात यावी.
या प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरणविषयक परवानग्यांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व पुनर्तपासणी करण्यात यावी.
हा प्रकल्प या निसर्गरम्य क्षेत्रातून पूर्णपणे हटवून अन्य कोणत्याही पर्यायी मोकळ्या किंवा पडीक जागेत त्वरित स्थलांतरित करण्यात yaवा.
​निसर्ग आणि पर्यावरण वाचवणे हे प्रत्येकाचे घटनात्मक कर्तव्य असून प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन महासंघाने केले आहे. जर शासनाने लोकभावनेचा आदर केला नाही आणि हा निसर्गाचा संहार न थांबवल्यास, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
​हे निवेदन देताना व सदर प्रसंगी नंदकिशोर तोष्णीवाल हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख, एड. तुषार यशवंत पवार, एड. गुणानंद यशवंतराव पतंगे, विनायक हेंद्रे (पत्रकार), अफजल शरीफ शेख (पत्रकार), धनंजय मारोतराव पतंगे आणि संजय शिवाजी भिसे उपस्थित होते.
​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *