* १७ वर्षे ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे उरकले जात होते लग्न
* लग्नमंडपात अक्षता पडण्यापूर्वीच पोलिसांची धडक कारवाई
* पालकांचे समुपदेशन करून लिहून घेतले कायदेशीर बंधपत्र
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | सहारा न्यूज डॉट इन (Saharanews.in)
छत्रपती संभाजीनगर:
घरची बिकट आर्थिक परिस्थिती आणि गरिबीमुळे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा उरकला जाणारा विवाह रोखण्यात प्रशासन आणि पोलिसांना मोठे यश आले आहे. सिडको एन-६ परिसरातील सुवर्ण सभागृहात (Suvrana Hall) अतिशय थाटामाटात पार पडत असलेल्या या बालविवाहावर जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांच्या ‘दामिनी पथकाने’ संयुक्तपणे धाड टाकून ही धडक कारवाई केली.
गरिबीमुळे पालकांनी घेतला होता लग्नाचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, वधू ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील रहिवासी असून तिचे वय १७ वर्षे ९ महिने आहे. मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने पालकांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. नात्यातीलच लाडसावंगी येथील एका २३ वर्षीय सुस्थितीत असलेल्या तरुणासोबत हा विवाह निश्चित करण्यात आला होता. मुलगा व्यवसायाने स्थिरावलेला असल्याने आणि मुलाकडील मंडळींनी लग्नासह मुलीच्या पुढील संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याने मुलीच्या पालकांनी या विवाहास संमती दिली होती.
अक्षता पडण्यापूर्वीच पोलिसांचा हस्तक्षेप
सिडकोतील सुवर्ण सभागृहात लग्नाचा सोहळा अत्यंत थाटामाटात सुरू होता. सर्व पाहुणे मंडळी जमली होती आणि वधू-वर विधीसाठी स्टेजवर जाण्याच्या अगदी काही क्षण आधीच पोलिसांची तातडीची कारवाई पाहायला मिळाली.
महिला व बालविकास विभागाचे सदस्य नितेश दुर्व्हे यांना या बालविवाहाची अत्यंत गोपनीय माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दामिनी पथकाला अलर्ट केले. माहिती मिळताच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंदे, पवार, पोलीस अंमलदार मोनिका दिवे आणि चालक सीता ढाकणे यांच्या पथकाने तातडीने सुवर्ण सभागृह गाठून विवाह सोहळा मध्यंतरीच रोखला.
पालकांचे समुपदेशन व कायदेशीर कारवाई
कारवाईनंतर दोन्ही बाजूच्या पालकांचे आणि नातेवाईकांचे प्रशासनातर्फे समुपदेशन करण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही, याबाबतचे कायदेशीर बंधपत्र (Bond) पालकांकडून लिहून घेण्यात आले. प्रशासनाच्या आणि दामिनी पथकाच्या या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाने एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य बालविवाहाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचले आहे.