कळमनुरी ( : कळमनुरी शहरात मुसळधार पावसामुळे मोठी दाणादाण उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून, नाल्यांची सफाई न झाल्याने घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे कळमनुरीसह परिसरातील अनेक गावे वसाहती झाल्या आहेत . पावसाचे पाणी थेट घरात शिरल्यामुळे नागरिकांचे साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे . सर्वात गंभीर बाब म्हणजे, नाल्यांची आधीच नियमित सफाई नसल्याने, पावसाच्या पाण्यासोबत नाल्यांमधील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे .
नगरपरिषद प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते, तसेच नाल्यांची सफाई न केल्याची तक्रार अल्पसंख्यांक आयोगाकडे देखील करण्यात आली होती . पावसाने जुन्या समस्या पुन्हा समोर आल्या असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराला नागरिकांनीच जबाबदार धरले आहे.
कळमनुरी नगरपरिषदेकडे शहरातील मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असली तरी, वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते . सध्या पाऊस ओसरला असला, तरी पाण्याची साठलेली स्थिती आणि घाणीचे साम्राज्य कायम असून, प्रशासनाने तातडीने सफाई मोहीम राबवून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.