हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
महावितरणच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतील गैरप्रकारावर ‘सहारा न्यूज’ (Shahranews.in) ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वृत्ताची तत्काळ व गंभीर दखल घेत महावितरण हिंगोली विभागाने संशयित व बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला असून संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तीन दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर व कागदपत्रे सादर न केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सज्जड इशारा महावितरणने दिला आहे.
‘सहारा न्यूज’चा दणका, बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले
शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळावी यासाठी शासनाकडून सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात काही दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रत्यक्षात शेतजमीन नसलेल्या भूमिहीन व्यक्तींच्या नावे तसेच बनावट सातबारा व खोट्या कागदपत्रांच्या आधारे सोलर पंपांचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संपूर्ण गैरव्यवहाराचे सविस्तर वृत्त ‘Shahranews.in’ वर “महावितरणच्या ‘सोलर कृषी पंप’ योजनेत मोठा घोटाळा? भूमिहीन आणि बोगस अर्जांवर दिले जात आहेत कृषी पंप!” या मथळ्याखाली सप्रमाण प्रसिद्ध करण्यात आले होते.
हे वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वृत्त वाचून जागे झालेल्या प्रशासनाने तात्काळ चौकशीची चक्रे फिरवत संशयित प्रकरणांची पडताळणी सुरू केली.
तीन दिवसांची मुदत; अन्यथा पोलिसांत धाव
महावितरणच्या हिंगोली कार्यालयाने संशयित लाभार्थ्यांना अधिकृत नोटिसा पाठवून त्यांचे मूळ कागदपत्रे, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा व सातबारा उताऱ्याची वैधता तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की:
* संबंधित लाभार्थ्यांनी नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करावा.
* विहित मुदतीत खुलासा न आल्यास किंवा सादर केलेली कागदपत्रे बोगस/बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास, शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील.
* याशिवाय बोगस पद्धतीने बसवण्यात आलेले सोलर पंप तात्काळ जप्त करून योजनेचा खर्च वसूल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
दलाल व भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले
महावितरणने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलर पंप लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला हक्काच्या पंपासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या गरजू व प्रामाणिक शेतकऱ्यांनी ‘सहारा न्यूज’च्या या जनहितैषी भूमिकेचे व पाठपुराव्याचे मनापासून आभार मानले आहेत.
आता या नोटिसांनंतर प्रत्यक्ष किती जणांवर गुन्हे दाखल होतात आणि या रॅकेटमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.